हिमायतनगर प्रतिनिधी /-विष्णु जाधव
देशात दर पाच वर्षानी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाही मार्गाने पार पडतात. या निवडणुकांमध्ये देशातील सर्व सामान्य नागरीक आपले बहुमुल्य मत मतपेटीतून गुपीत स्वरूपात मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडतात.
परंतु जनतेंनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी सामान्य नागरीकांच्या भावनांशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघात बघायला मिळत असून विकास कामांपासून वंचित असल्याची प्रचिती बघायला मिळते.
हदगाव -हिमायतनगर विधानसभेतील नागरीकांना विद्यमान आमदार साहेबांकडून केवळ माफक अशा जनहिताच्या कामाची अपेक्षा ठेवली होती. त्यात प्रामुख्याने ग्रामिण भागातील गावे तालुक्याला चांगल्या रस्त्यांनी जोडल्या जावे जेणेकरून दळणवळणाची योग्य सोय होईल.
पिण्याच्या पाण्याबरोबर , जनावरे जंगली प्राणी व शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे. मुबलक पाणी मिळाले तर शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नात वाढ झाली तर शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. चांगली आरोग्य सेवा मिळावी.
अशा अपेक्षा विद्यमान आमदार साहेबांकडून हिमायतनगर तालुक्यातील जनतेला होत्या. परंतु विद्यमान आमदार साहेबांनी मागील पाच वर्षात हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांकडे पाठ फिरवली तर अनेक ठिकाणी निकृष्ट कामे केली. निकृष्ट आणि रखडलेल्या कामाच्या विरोधात ज्यांनी आंदोलने केली ती आंदोलने दाबून टाकण्याचं काम केल्या गेलं.
एकंदरीतच लोकप्रतिनिधींनी नागरीकांना कोणतीच सुविधा पुरविली नसल्याने चांगली विकासकामे करणारा आमदार हवा की, जवळच्या कंत्राटदारांचे आणि आपल्याच कार्यकर्त्याचे खिसे भरून निकृष्ट कामांना संमती देणारा आमदार हवा हे आता जनतेनीच ठरवावे अशी चांगलीचं चर्चा जाणकार नागरीकांमध्ये हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात रंगल्याची ऐकायला मिळत आहे.